मैत्रीणीचा वाढदिवस आणि शॉर्टकट बेतला जीवावर

कामशेत : पोलीसनामा ऑनलाईन

मैत्रीणीच्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. वाढदिवस साजरा करून लोकल पकडण्यासाठी वापरलेला शॉर्टकट या तरुणीच्या जीवावर बेतला आहे. हा प्रकार आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास कामशेत रेल्वेस्थानकाजवळ घडला.

स्नेहल मोहन किर्तीकर (वय-24, रा. पुणे, मुळ रा. बेळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

स्नेहल पुण्यातील एका खासगी हॉस्टेलमध्ये राहते. शनिवारी ती आणि तिच्या पाच मैत्रीणी कामशेत जवळील पिंपळोली या गावात मैत्रीणीच्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या. आज सकाळी पुण्याला परत येण्यासाठी या सर्वजणी निघाल्या. कामशेत रेल्वे स्थानकावर वेळेत पोहचण्यासाठी त्यांनी लोहमार्गाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. कामशेत किलोमिटर १४३/२४ जवळ आल्यानंतर ८.२५ ची एक्सप्रेस गाडी पाठीमागून आली. गाडीच्या भितीने या सर्व मुली पळाळ्या परंतू पळताना स्नेहलचा पाय घसरला आणि ती खाली पडली. बाजूलाच असलेल्या इंद्रायणी नदी पात्राच्या कडेला असलेल्या दगडावर तिचे डोके आपटले.

स्नेहलला गंभीर अवस्थेत कामशेत येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तिचा मृत्यू जागेवरच झाला असल्याचे सांगितले. पुढील तपसा लोणावळा लोहमार्ग पोलीस करत आहेत.