सांगलीचा ‘तो’ पोलीस अडकला ठाणे पोलिसांच्या जाळ्यात

ठाणेः पोलीसनामा आॅनलाईन

मित्राला पोलीस दलात भरती करण्यासाठी सांगली पोलीस दलातील पोलीस शिपायाने स्वत: अर्ज करुन चेस्ट क्रमांकाची आदलाबदल करुन मैदानात प्रवेश मिळवण्याची योजना आखली. परंतु या ठिकाणी असलेल्या एका अन्य व्यक्तीने त्याला ओळखले आणि ‘तो’ ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अलगद आडकला. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिसांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून पोलीस शिपायाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संग्राम संजय साळुंखे ( बंक्कल नंबर- 1893) असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. संग्राम हा सांगली पोलीस दलात कार्य़रत आहे.

ठाणे पोलीस मुख्यालयात सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. मित्राला भरती करण्यासाठी त्याने देखील दुस-यांदा अर्ज केला होता. दोघांनी संगणमत करुन शारिरीक चाचणीत चांगले गुण मिळवण्यासाठी मिळालेल्या चेस्ट क्रमांकाची अदला बदल करण्याची योजना आखत मैदानावर प्रवेश केला. त्याच वेळी मैदानावर शारिरीक चाचणीसाठी आलेल्या अन्य एका व्यक्तीने पोलीस शिपाई संग्राम साळुंखे याला ओळखले. संग्राम साळुंखे हा 2014 -15 मध्ये पोलीस दलात भरती झाला असून तो परत मैदानी चाचणीसाठी कसा काय उतरला आहे याची खात्री केल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार ठाणे पोलिसांच्या कानावर घातला.

झालेल्या प्रकाराची माहिती मिळताच ठाणे पोलीसांनी साळुंखेला मैदानाच्या बाहेर काढत सांगली पोलिसांना याची माहिती दिली.