हायस्पीड स्पोर्टस बाईक चोरणारे तीन अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महागडी यामाहा हायस्पीड स्पोर्टस बाईक चोरणा-या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केली आहे. तर आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. खडक पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलिसांना दहावीत शिकणा-या तीन मुलांकडे एक लाख तीस हजार रुपये किंमतीची यामाहा आर १५ हायस्पीड स्पोर्टस बाईक असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या महितीनुसार पोलिसांनी तीघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही दुचाकी एक महिन्यापूर्वी भिकारदास मारुती मंदीर सदाशिव पेठ येथून चोरल्याची कबूली दिली. याप्रकरणी अमृत अभिमन्युसिंग राजपुत (वय-29 रा. आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेली मुले ही दहावीमध्ये शिकत असून त्यांची दहावीची परिक्षा सुरु आहे. बुधवारी (दि.21) रोजी केलेल्या कारवाईत आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे युनिकॉर्न दुचाकी जप्त करण्यात आली. दुचाकी बाबत चौकशी केली असता त्याने ती गोखलेनगर जनवाडी येथून चोरल्याची कबूली दिली.

दरम्यान पोलिसांनी लल्या उर्फ विशाल भारत पारधे (वय-19, रा. गंज पेठ, पुणे) या सराईत चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या. पारधे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन असल्यापासून तो दुचाकी चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी सहावे न्यायलय पुणे यांचे न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

खडक पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये तीन लाख रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींकडून खडक पोलीस ठाण्याचे सहा, कोंढवा पोलीस ठाण्याचा एक आणि चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचा एक असे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, उप आयुक्त पिरमंडळ -१ बसवराज तेली, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, तपासी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी शाम लोहोमकर, समीर शिंदे, बाळासाहेब बारावकर, प्रविण गव्हाणे, विनोद जाधव, रवि लोखंडे, समीर माळवदकर, अशिष चव्हाण, अनिकेत बाबर यांनी केली.