कोरोना अत्यंत भयंकर ! बरे झाल्यानंतरही करावा लागतोय ‘या’ आजारांचा सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्यपैकी एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. पण कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. मात्र, असे असले तरीही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मेंदू आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे, हे आता एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्यासोबतच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या न्युरॉलॉजिकल आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा सर्व्हेतून अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, कोरोनामुक्त झालेल्या 2 लाख 30 हजारांपेक्षा जास्त लोकांच्या आरोग्याच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यापैकी 34 टक्के लोकांना 6 महिन्यांत न्युरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्यांनी ग्रासले होते, असे ‘लॅन्सेट सायकायट्री जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टवरून सिद्ध झाले आहे. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांत तीनपैकी एका रुग्णाला न्युरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले.

स्टोक, स्मृतिभ्रंशचीही लक्षणे…

कोरोनातून बरे झालेल्या या सर्व लोकांमध्ये स्मृतिभ्रंश, स्ट्रोक आणि न्युरॉलॉजिकल डिसऑर्डर यांसारखी लक्षणेदेखील आढळली आहेत. पण याचे प्रमाण कमी आहे. 17 टक्के लोक अत्यंत चिंताग्रस्त, तर 14 टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरबाबतची लक्षणे आढळून आली. कोरोना संबंधीचे हे संशोधन खूप महत्त्वाचे मानले जात आहे.