१ कोटीचे लाच प्रकरण : तहसिलदार आणि ‘त्या’ पत्रकाराच नविन वर्ष एसीबीच्या कोठडीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जमीनीच्या वारस नोंदी करण्यासाठी मुळशीच्या तहसिलदारासह एका कथीत पत्रकाराला अँन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली. या दोघांना आज (रविवार) न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे तहसिलदार आणि कथीत पत्रकाराचे नवीन वर्ष अँन्टी करप्शनच्या कोठडीत जाणार आहे.

तहसिलदार सचिन डोंगरे याने दौड तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे वडीलोपार्जित जमीनीच्या वारस नोंदी लावण्यासाठी १ कोटीची लाच मागितली. तक्रारदाराकडून लाच स्विकारताना डोंगरे याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. डोंगरे याने ही लाच खासगी इसम (पत्रकार) याच्या मार्फत स्विकारली. त्यामुळे खासगी इसमास या गुन्ह्यातील सह आरोपी करण्यात आले असून त्याला आज दुपारी साडेचारच्या सुमारास अटक करण्यात आली.

तहसिलदार डोंगरे याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला, आरोपी तहसिलदार याने लाचेची मागणी करुन स्विकारलेली एक कोटीची रक्कम ही मोठी असून यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का याचा तपास करणे बाकी आहे. डोंगरे याने निकालपत्र देण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकरली असून या संदर्भातील कागदपत्र ही त्याच्या कार्य़ालयात असून कार्यालय बंद असल्याने कार्यालयातील संबधीत कागदपत्राच्या प्रती तपासून पासून ताब्यात घ्यावयाच्या आहेत. तहसीलदार डोंगरे याच्या आवाजाचा नमुना पंचनामा करणे बाकी आहे.

तसेच आरोपी तहसिलदार डोंगरे याचे मुळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी हे आहे. या ठिकाणी त्याचा बंगला व बँक ऑफ इंडियाच्या मोहोळ शाखेत लॉकर आहे तर करमाळा शाखेत देखील लॉकर असल्याची माहिती मिळाली आहे. या लॉकरच्या चाव्या डोंगरे याच्याकडे असून त्या ताब्यात घ्यावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे डोंगरे याचा सोलापूर येथे प्लॅट असून सदर बंगल्याची झडती रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे आरोपी सचिन डोंगरे याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तीवाद आज न्यायालयात सरकारी पक्षाकडून करण्यात आला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने त्याला २ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.