Nagpur News : Facebook फ्रेंडशिप पडली महागात ! वृद्धाची लंडनच्या एका मैत्रिणीने केली 10 लाखाची फसवणूक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर जिल्ह्यातील एका ६६ वर्षीय वृद्ध व्यक्तीची लंडनच्या एका कथित फेसबूक मैत्रिणीने १० लाखाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. हे वृद्ध व्यक्ती सेवानिवृत्त असून ते आता मैत्रिणीच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. फेसबूक फ्रेंडशिप त्या मैत्रिणीने कस्टम ड्युटीच्या नावाखाली या वृद्धाला लाखाला गंडा घालत, १० लाख रुपये ही मैत्रिण आणि तिच्या टोळीने लंपास केले आहे. लिडा थॉमसन असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरमधील एका वृद्धाची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर लिडा थॉमसन नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. आधी चॅटिंग नंतर फोनवर सतत बोलणे होऊ लागले. लिडाने तिचे लंडनमधील अनेक नामांकित ठिकाणांवरचे फोटो दाखवून नागपुरातील या वृद्ध व्यक्तीला भुरळ घातली. टाळेबंदीच्या काळात अचानक एक दिवशी लिडाने ती भारतात येणार आहे. आणि तिच्याकडील कोट्यावधी रुपयांनी भारतात सेवा कार्य करणार आहे. असे सांगितले. नागपुरातील या वृध्दानेही तिला होकार दिला. तसेच अचानक एकेदिवशी लिडाचा पुन्हा फोन आला आणि ती दिल्ली एयरपोर्टवर अडकली असून तिला कस्टम अधिकाऱ्यांनी थांबवल्याचे खोटे बोलले. तिच्याकडे भारतात सेवा कार्यासाठी आणलेले २ कोटी रुपये असल्याने तिला कस्टमवाले १० लाख कस्टम ड्युटी भरल्याशिवाय बाहेर निघू देत नाही आहे, असं लिडाने त्या वृद्धाला सांगितले.

लिडाने त्यानंरतर फोनवरून बनावट एयरलाईनचे अधिकारी आणि बनावट कस्टम अधिकारी यांच्याशी बोलणे करून दिले. आणि लिडाने सांगितलेल्या बँक खात्यात त्या वृद्ध व्यक्तीने तब्ब्ल ९ लाख ६६ हजार रुपये पाठवले. त्यांनतर लिडा आणि बनावट एयरलाईन व कस्टम अधिकारीही बेपत्ता झाले. तर अनेक दिवस लिडाची वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध व्यक्तीने बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, पोलीस तपासात वृद्धासोबत बोलणारी महिला कधीच लंडनमधून बोलत नव्हती तर ती दिल्लीतूनच बोलत होती, असं समोर आले आहे.