Pimpri News : 22 कोटीच्या कर्जमंजुरीसाठी 11 कोटीची लाच, चौकशीची मागणी

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत घोटाळ्यांची मालिका सुरुच असून आता पिंपरी चिंचवड शाखेमध्ये 22 कोटी रुपयाच्या कर्जमंजुरीसाठी 11 कोटी म्हणजेच 50 टक्के कर्जमंजुरीची रक्कम लाच म्हणून स्विकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बँकेचे संचालक राजेंद्र गांधी यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे निवेदन दिले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नुकताच तीन कोटी रुपयाचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता 11 कोटी रुपयाची लाच स्विकारल्याचा आरोप बँकेचे संचालक राजेंद्र गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

बँकेत झालेल्या तीन कोटी रुपयाच्या घोटाळ्यातील आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आरोपींनी बँकेच्या पिंपरी चिचंवड शाखेत 22 कोटी रुपयाचा अपहार केला असून तेच या घोटाळ्याचे सुत्रधार आहेत. राजेंद्र गांधी यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शाखेतील या कर्जप्रकरणातील मुल्यांकन करणाऱ्या बँकेच्या पॅनेलवरील मुल्यांकनकाराने नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या लेटरपॅडचा वापर करून 1 कोटी मुल्यांकनाची मालमत्ता 22 कोटी रुपये असल्याचे दाखवण्यात आल्याचे मुल्यांकाराचे म्हणणे आहे. या प्रकरणातील आरोपींचे राजकीय लागेबंध असलेली आणि राजकीय वजनदार व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात काही कारवाई होत नाही. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आरोपींना मदत केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राजेंद्र गांधी यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.