सांगलीत डेंग्यूचा ११ वा बळी ; परिसरात भीतीचे वातावरण

सांगली | पोलीसनामा आॅनलाइन –  शहरातील संजयनगर येथील युवकाचा शनिवारी डेंग्यूने मृत्यू झाला. अमोल आनंदराव कोळेकर  (वय 32 ) असे या तरूणाचे नाव आहे. गेल्या साडेचार महिन्यात मनपाक्षेत्रात डेंग्यूने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांचे बळी जात असताना मनपा आरोग्य विभाग सुस्तच असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अमोल कोळेकर हा छोटा हत्ती चालवून आपले कुटुंब चालवित होता. मात्र आठ दिवसापूर्वी अचानक त्याला ताप आला. किरकोळ उपचार करूनही ताप कमी होत नसल्याने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र ताप वाढतच गेला. तपासणीत डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यु झाला. पंधरा दिवसामध्ये संजयनगर मधील डेंग्यूचा हा दुसरा बळी आहे. दिवाळीपूर्वी गोपाळ हिरेमठ (हडको कॉलनी, संजयनगर ) याचा डेंग्यूनेच मृत्यू झाला होता.

दरम्यान, मनपाक्षेत्रात गेल्या काही दिवसापासून डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. यामुळे मोठ्या संख्येने नागरिक त्रस्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डेंग्यूचे 450 रूग्ण आहेत. तर स्वाईनचे 35 रूग्ण असून आत्तापर्यंत या दोन्ही आजारामुळे तब्बल  16 जणांचा मृत्यू झाला असून डेंग्यूचा हा अकरावा बळी आहे.

मनपाक्षेत्रात साथीच्या आजाराने अनेकजण त्रस्त असताना मनपाची आरोग्य यंत्रणा अध्याप सुस्तच आहे. गटारी तुंबलेल्या असून कचऱ्याचाही उठाव केला जात नाही. डासांनी हैराण करून सोडले आहे. सुस्त आरोग्य विभाग आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल केला जात आहे.

दरम्यान, सुस्त आरोग्य विभागामुळेच डेंग्यूसह साथीचा आजार मनपाक्षेत्रात फैलावला असून आरसीएचे 10 डॉक्टर, सहाय्यक 41 आणि 91 लिंकवर्कर नेमके काय करतात कशाचा पगार घेतात ? असा सवाल स्वाभिमानीचे सतीश साखळकर यांनी केला आहे.