‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अन् लतादीदींच्या ट्विटमागे 12 जणांचा हात; भाजपच्या आयटी सेलची होणार चौकशी ?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत आंतराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्विट केले होते. त्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी आमच्या अंतर्गत बाबींबद्दल बोलण्याची गरज नाही, असे म्हणत रिहानाला खडसावले होते. त्यांच्या या ट्विटबाबत भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यात येणार असून, त्यासंबंधी एकूण १२ जणांची ओळख पटल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोनाची लागण झाली असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “सेलेब्रिटींच्या ट्विट प्रकरणात माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. आम्ही भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे. १२ लोकांची ओळख पटली असून, त्यांची चौकशी होणार आहे.”

“भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे आमचे दैवत आहे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला,” असेही देशमुख यांनी यावेळी नमूद केले.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी बोलताना गृहमंत्री म्हणाले, “शिवसेनेचे मंत्री संजय राठोड प्रकरणात कोणावरही दबाव नाही, मुळात दबावाचा प्रश्न येत नाही. नियमानुसार, चौकशी होईल, जे दोषी आढळतील त्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र, विरोधीपक्ष करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही,” असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

सचिन सावंतांनी केली होती चौकशीची मागणी

“आंतराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यावर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्विट केले होते. यातील शब्द सुद्धा एकसारखे होते. या सेलिब्रिटींनी एक सारखे ट्विट केले का याबाबत दबाव नेमका कोणाचा होता का?,” याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.