भिवंडीतून 12 हजार जिलेटिन कांड्या, डिटोनेटर जप्त; स्फोटकांचा मोठा साठा पाहून पोलिसही अवाक्

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – भिवंडीमध्ये जिलेटीनच्या हजारो कांड्या बेकायदेशीररीत्या साठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने भिवंडीत एक मोठे सर्च ऑपरेशन करुन ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 12 हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ला यश आले. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कारवली या ठिकाणी मित्तल एंटरप्रईजमध्ये करण्यात आली. पोलिसांनी एकाला अटक केली असून स्फोटकांचा एवढा मोठा साठा अवैधरित्या साठवल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे स्फोटकांचा साठा करणे अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे (वय-53) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना स्फोटक संदर्भात माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कारवली येथील मित्तल इंटरप्रायजेसच्या गोदामावर छापा टाकला. छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी असलेले स्फोटकं पाहून पोलिसांना धक्का बसला. या ठिकाणी एवढा स्फोटकांचा साठा होता, की संपूर्ण भिवंडी शहर उद्धवस्त झाले असते.

पोलिसांनी या कारवाईत जवळपास 60 खोक्यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल 12 हजार कांड्या जप्त केल्या आहेत. तसेच भरुन ठेवलेले 3008 डेटोनेरही जप्त केले आहे. बेकायदेशीर जिलेटीन कांड्या आणि डेटोनेटरचा साठा कोणत्याही सुरक्षित स्थळी न ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा साठा एका कपाटात ठेवण्यात आला होता. आरोपीचा खाणकामाचा व्यवसाय असून त्याने हा साठा बेकायदेशीर पणे खोदकामासाठी साठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉब शोधक आणि नाशक पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. स्फोटकांचा हा साठा जप्त करुन वाडा येथील सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आला आहे.