धक्कादायक ! भावाने गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने 12 वर्षीय मुलाची आत्महत्या

बुलढाणाः पोलीसनामा ऑनलाइन – गेम खेळण्यासाठी भावाने मोबाईल दिला नाही म्हणून अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना टाकळीपंच (जि. बुलडाणा) येथे घडली आहे. शनिवारी (दि. 3) घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शैलेश परमेश्वर इंगळे (वय 12,रा. टाकळीपंच, ता. संग्रापूर, जि. बुलडाणा) असे आत्महत्या केेलेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकळीपंच येथील परमेश्वर इंगळे आणि नीता इंगळे या शेतकरी दाम्पत्याने कोरोना काळात आपली मुल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दिवसभर शेतीची कामे करून अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता. शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे दिलेल्या मोबाइलवर मुल दिवसभर काय करतात याकडे त्यांनी कधी लक्ष दिलेच नाही. घरात दोघे भावंड अभ्यास सोडून मोबाइलवर ऑनलाइन गेम्स खेळत होते. शनिवारी या भावंडांपैकी शैलेश या 12 वर्षीय मुलाला त्याच्या भावाने मोबाइल न दिल्याने त्याने रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या केली. इंगळे कुटुंबीय या घटनेमुळ पुरते हादरून गेले आहेत. परमेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे त्यांना समजले. त्यातूनच शैलेशने विष घेतल्याचे त्यांनी म्हटले. शाळा चालू असती तर मोबाइलच आणावा लागला नसता, या मोबाइलमुळेच हे घडल असल्याचे दु:ख या आईबापाने व्यक्त केले आहे.