मटक्याच्या अड्यावर छापा, १५ जणांना अटक

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला आहे. मंगळवारी बिलोली येथील मटका आड्ड्यावर कारवाई करुन एक लाखाचा मुद्देमाल जप्त करुन १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव व सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी बिलोली शहरात अवैध धंद्यावर कारवाई केली. बिलोली शहराती लोहारगल्ली भागात असलेल्या जामा मशिद परिसरातील शेख साजीद लाल अहमद याच्या घरात कल्याण, मिलन नावाचा मटका सुरु होता. विशेष पथकाने चारी बाजूचे रस्ते बंद करुन छापा टाकला. छापा टाकताच जुगाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी चारी बाजूने रस्ते बंद केल्याने जुगाऱ्यांना पळून जाता आले नाही. पथकाने आड्ड्यावर छापा टाकून ४२ हजार रुपयांची रोकड, ५८ हजार रुपयांचे १६ मोबाईल जप्त करुन १५ जणांना अटक केली.

शिवप्रकाश मुळे यांच्या फिर्यादीवरुन बिलोली ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीमुळे बिलोली शहरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या विशष पथकाने बिलोली शहरात येऊन मोठी कारवाई केली. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका अड्डा चालतो हे बिलोली पोलिसांना माहिती नसल्याने आश्चर्य़ व्यक्त होत आहे.