Coronavirus : प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड ! पुणे-दानापूर ट्रेनमधून 17 कोरोनाबाधितांचा प्रवास

पटना : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट असून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. पुण्याहून दानापूर येथे आलेल्या एका ट्रेनमध्ये १७ कोरोनाबाधित आढळले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास कोरोना काळा सुरु असलेली विशेष रेल्वे दानापूर रेल्वे स्थानकात पोहोचली. निर्धारित वेळेपेक्षा ४८ मिनिटं लवकर ही रेल्वे दानापूरला पोहोचल्याने मेडिकल टीम तपासणीसाठी पोहोपर्यंत अर्धा तपास प्रवाशांना रेल्वेतच थांबावे लागले. मेडिकल तपासणीची १५ पथके स्थानकात पोहोचली. त्यानंतर प्रवाशांना रांगेत उतरून चाचणी केली. ५२४ प्रवाशांच्या तपासणी केल्यानंतर त्यामध्ये १७ कोरोनाबाधित आढळले.

सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामधंदे ठप्प पडल्याने अनेक कामगारांनी घरचा रस्ता पकडला आहे. बाधित आढळलेले सर्वजण कामानिमित्त पुण्यात गेले होते. शनिवारी बिहारमध्येही कोरोनाचा कहर पहायला मिळत असून गेल्या २४ तासात ३ हजार ४६९ रुग्ण आढळले आहेत. राज्यात बाधितांची संख्या ११ हजार ९९८ वर पोहोचली असून पटना येथे सर्वाधिक १ हजार ४३१ रुग्ण आढळले आहेत. बिहारमध्ये गया ३१०, औरंगाबाद ९३, बेगुसराय ८०, भागलपूर ९७, भोजपूर ७४, जहानाबाद ७७, लखीसराय ७०, मुजफ्फरपूर १८३ तर पूर्णिया ८७ असे कोरोनाबाधित आढळले. बिहारमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. गेल्या २४ तासात ९५ हजार ११२ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३ हजार ४६९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंंत राज्यात २ लाख ६५ हजार ८७० कोरोनाबाधित आढळले आहेत.