पुणे विमानतळावर 20 लाखांचं तस्करी करून आणलेलं सोनं जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आखाती देशातून महिलेने तस्करी करून आणलेले सोने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडले. तिच्याकडून भुकटी स्वरुपात असलेले ६४२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून सोन्याच्या भुकटीची किंमत १९ लाख ९८ हजार रुपये आहे.

या प्रकरणी मरिअम मोहम्मद सलीम शेख (रा. मुंबई) हिच्या विरोधात भारतीय कस्टम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगाव येथील पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर पहाटे चारच्या सुमारास दुबईहून आलेले विमान उतरले. विमानतळावर उतरल्यानंतर शेख गडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्नात होती. शेखला कस्टमच्या पथकाने पाहिले. संशयावरुन तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे असलेल्या साहित्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्याकडे काही औषधी गोळ्या (कॅप्सुल) सापडल्या. गोळ्यांची तपासणी करण्यात आली.

तेव्हा गोळ्यांमधील अंतर्गत भागात तिने सोन्याची भुकटी लपविल्याचे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची भुकटीची किंमत १९ लाख ९८ हजार १३८ रुपये आहे. तस्करीचे सोने ती कोणाला देणार होती, यादृष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली. सहआयुक्त पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली

You might also like