आता देशातील कोणत्याही ATM मधून निघणार नाही 2000 ची नोट, मशीन्समध्ये बदल सुरू, जाणून घ्या चालणार की नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला एटीएममधून २,००० रुपयांची नोट काढायची असेल तर ते आता शक्य होणार नाही. देशभरातील सुमारे २,४०,००० एटीएममधून २ हजार रुपयांच्या नोटांचे ट्रे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता प्रत्येक मशीनमध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांची ट्रे उपलब्ध होईल. माहितीनुसार एटीएममध्ये उपस्थित असलेल्या ४ ट्रे पैकी ३ मध्ये ५०० रुपयांच्या नोटा ठेवल्या जातील आणि उर्वरित १ मध्ये १०० किंवा २०० रुपयांच्या नोटा मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान, अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने आपल्या सर्व ३००० एटीएममध्ये २ हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा आदेश जारी केला होता. बँकेचा असा युक्तिवाद होता की एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेतल्यानंतर, लोक लहान नोटांसाठी बँकेच्या शाखांमध्ये येतात, त्यामुळे मोठी गर्दी होते. त्यामुळे, एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा काढून टाकल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही.

पूर्वीप्रमाणे दोन हजार रुपयांच्या नोटा वैध असतील. माहितीनुसार, सरकार या नोट्स दैनंदिन व्यवहारातून हळू हळू हटवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, एका रिपोर्टच्या दाव्यानुसार एका मोठ्या सरकारी बँकेने आपल्या सर्व शाखांमधून दोन हजार रुपयांच्या नोटा परत केल्या आहेत. एवढेच नव्हे तर या नोटा आरबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये जमा केल्या जात आहेत. ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. यानंतर ५०० रुपयांच्या नवीन नोटा दिल्या गेल्या आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या गेल्या. त्याऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या.