निर्भया केस : फाशी टाळण्यासाठी मुकेशनं दाखल केली सुप्रीम कोर्टात याचिका, जुन्या वकिलांवर केले ‘गंभीर’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मृत्यूदंड ठोठावल्यानंतर चारही दोषी (पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश कुमार सिंह आणि अक्षय) हे सध्या अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, या चार दोषींपैकी एक म्हणजे मुकेश कुमार सिंह याने आपल्या जुन्या वकिलावर गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुकेशने याचिकेत आपल्या वकिलामार्फत उपचारात्मक याचिका (Curative petition) दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. मुकेशचा भाऊ सुरेश याने वकील एम.एल. शर्मा यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषी मुकेश कुमार सिंगचे वकील एम.एल. शर्मा यांनी या प्रकरणात केंद्र सरकारसह दिल्ली सरकार आणि अ‍ॅमिक्स क्यूरी यांनाही प्रतिवादी बनविले आहे. याचिकेत असा देखील युक्तिवाद करण्यात आला आहे की त्याला कारण नसताना बळी ठरवण्यात आले आहे. मुकेशने आपल्या मागील वकील वृंदा ग्रोव्हर यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की त्याला सांगण्यात आले नाही की सुधारात्मक याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षाचा अवधी असतो. त्यामुळे त्याला पुन्हा सुधारात्मक याचिका आणि अन्य कायदेशीर विकल्प वापरण्याचा वेळ देण्यात यावा.

दिल्ली सरकारच्या याचिकेवर पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी नवीन डेथ वॉरंट जारी करुन फाशी देण्याची तारीख २० मार्च निश्चित केली आहे. डेथ वॉरंटनुसार चारही दोषींना २० मार्च रोजी पहाटे ५:३० वाजता तिहार जेल नंबर -३ मध्ये फाशी देण्यात येणार आहे.