कारगिल ‘वॉर’ची 21 वर्ष : जेव्हा हवाईदलाच्या मिग-21, मिग-27 आणि मिराज 2000 फायटर जेटने 20,000 फुटांवरून टाकले ‘बॉम्ब’

नवी दिल्ली : 26 जुलै…21 वर्षांपासून हा दिवस भारतासाठी गौरवशाली इतिहासाची आठवण करण्याचा दिवस बनला आहे. एक असा इतिहास जो भारताचे विजयी सैन्य आणि शूर सैनिकांशी संबंधित आहे. एक इतिहास जो सांगतो की, 26 जुलै 1999 ला कशाप्रकारे भारताच्या सैन्याने पाकिस्तानचे दहशतवादी आणि त्यांच्या सैनिकांना देशाच्या सीमेच्या बाहेर हाकलले. होय, आम्ही सांगत आहोत कारगिलच्या युद्धाबाबत. हे एक असे युद्ध होते, ज्यामध्ये सैन्याने कारगिलच्या ऊंच पर्वतांवर शत्रूला धूळ चारली तर हवाईदलाने दाखवून दिले की, कमी साधने असली तरी जगाने आम्हाला सहजतेने घेऊ नये.

मे महिन्यात भारताच्या सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना आणि मिलिट्रीला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन विजय लाँच केले. आयएएफने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सफेद सागर लाँच केले. कारगिलमध्ये सुमारे 23,000 फुट ऊंचीवर करण्यात आलेले ऑपरेशन सफेद सागर काही सोपे काम नव्हते. 11 मे 1999 ला इंडियन आर्मीला सपोर्ट देण्यासाठी इंडियन एयरफोर्सला बोलावण्यात आले. या ऑपरेशनमध्ये मिग-27, मिग-21 आणि मिग-29 सारखे फायटर जेट सहभागी होते. 27 मे रोजी मिग-21 आणि मिग-27 क्रॅश झाल्याने मिराज 2000 ला ऑपरेशनमध्ये सहभागी करण्यात आले.

वेस्टर्न एयर कमांडच्या अंबाला एयरफोर्स स्टेशनवरून पाकिस्तानला उत्तर दिले गेले. 25 मे रोजी आयएएफला एलओसी पार करून घुसखोरांवर हल्ला करण्याचा आदेश मिळाला होता. मात्र, तेव्हा सरकारकडून केवळ हेलीकॉप्टरमधून हल्ला करण्याची मंजूरी मिळाली होती. परंतु, त्यावेळी सरकारला सांगण्यात आले की, हेलीकॉप्टर यासाठी योग्य पर्याय होऊ शकत नाही. नंतर फायटर जेटला कारगिलमध्ये ऑपरेशनसाठी तैनात केले गेले.

ऑपरेशन सफेद सागर आजही आयएएफच्या इतिहासात एक मैलाचा दगड मानले जाते. ही पहिली वेळ होती जेव्हा आयएएफ इतक्या ऊंचीवर एखादे ऑपरेशन पार पाडत होती. कारगिलच्या पर्यावरणात मिशनशिवाय फ्यूल वाचवणे महत्वाचे होते. मिग आणि मिराज हवाईदलाची ताकद होते.

पहिला हल्ला 26 मे 1999 ला
हवाई दलाने पहिला हल्ला 26 मे, 1999च्या सकाळी 6:30 वाजता सुरू केला. या अटॅकमध्ये मिग-21, मिग-27 एमएल आणि मिग-23 बीएन फायटर जेट सहभागी होती. हल्ल्याच्या वेळी मिग-29 ने लढाऊ विमानांना कव्हर देण्यासोबत एयर डिफेन्सचे काम केले. हल्ल्याच्यानंतर कॅनबराने शत्रूच्या नुकसानीची रेकीसुद्धा केली. मिग-29 ने कारगिलच्या पर्वतांवर जमलेल्या शत्रूवर आर-77 मिसाईलने हल्ला केला होता. लागोपाठ 60 दिवस ऑपरेशन सफेद सागर सुरू होते आणि या दरम्यान 300 एयरक्राफ्टने 6500 सॉर्टीजला पूर्ण केले.

फायटर जेटने 1235 सॉर्टीजमध्ये 24 टारगेटवर हल्ला केला. कारगिलची ऊंची समुद्र सपाटीपासून 16,000 ते 18,000 फुट आहे. अशात फायटर जेटला 20,000 फुटापेक्षा जास्त ऊंच उड्डाण करावे लागत होते. हे काम अवघड होते कारण ऊंचावर हवेचा दाब सुद्धा जास्त होता.

इस्त्रायलने केली खुप मदत
ऑपरेशन सफेद सागर हवाई दलाने तीन टप्प्यात लाँच केले होते. पहिल्या टप्प्यात शत्रूच्या ठिकाणांची रेकी केली गेली. ज्यामध्ये त्यांच्याकडे असलेली शस्त्र आणि बंकर्सची माहिती होती. दुसर्‍या टप्प्यात ऊंच पर्वतांवर असलेले शत्रूचे कॅम्प, त्यांची शस्त्र आणि भोजनासह ऑईल सप्लायवर हवाईदलाने हल्ला केला.

तिसर्‍या टप्प्यात इस्त्रायलकडून मिळालेल्या लेझर गायडेड बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. इस्त्रायलने त्यावेळी आयएएफला खुप मदत केली आणि दुर्गम भागासाठी लेझर गाईडेड बॉम्ब आणि मिसाईलसह नाईट व्हिजन डिव्हाईससुद्धा आयएएफला उपलब्ध करून दिले. यासोबतच इस्त्रायलने ड्रोनद्वारे शत्रूचे अचूक लोकेशन शोधण्यात मदत केली.