‘मनसे’च्या मोर्चाचा जबरदस्त ‘इम्पॅक्ट’, मुंबईच्या विरारमधून 23 बांगलादेशींना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 9 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून बाहेर काढण्यासाठी विराट मोर्चाचे आयोजन केले गेले होते. या मोर्चानंतर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विरार येथील अर्नाळा येथून 23 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि मानवी तस्करी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. मनसेच्या या मोर्चामध्ये राज्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानवी तस्करी विरोधी विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकाने कळंब आणि अर्नाळा परिसरात मंगळवारी रात्री 11 वाजता छापेमारी करताच काही बांगलादेशींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांना पकडण्यात पथकाला यश आलं आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं. पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

पालघर शाखेचे महेश गोसावी, पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे आणि दहशतवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या सहाय्याने ही कारवाई करत 23 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यामध्ये आठ महिलांचा देखील समावेश आहे. पहाटे 4 वाजता अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी पंच म्हणून काम पाहिले.

धक्कादायक बाब म्हणजे कोणालाही संशय येऊ नये यासाठी या बांगलादेशी नागरिकांनी मराठी भाषा देखील अवगत केल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले. हे नागरिक या ठिकाणी भंगार गोळा करण्याचे आणि मोलमजुरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली. त्या दिवशी झालेल्या मनसेच्या मोर्चानंतर मनसे कार्यकर्ते अशा विदेशी घुसखोरांवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले आहे.