26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर अतिरेकी जकीउर रहमान लखवीला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर दहशतवादी जकीउर रहमान लखवीला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना मदत आणि त्यांना पैसे पुरवल्याबद्दल जकीउर रेहमान लखवीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जकीउर रेहमान लखवीने हाफिज सईद सोबत मिळून 26/11 च्या हल्ल्याचा कट रचला होता.

लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा ऑपरेशन कमांडर लखवीला मुंबई हल्ल्यानंतर 2008 मध्ये यूएनएससीच्या प्रस्तावा अंतर्गत संयुक्त राष्ट्र संघाद्वारे जागतिक दहशतवादी म्हणून नामीत केले होते. मुंबई हल्ल्याच्या चौकशीदरम्यान लखवीनेच हाफिस सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना तयार करून दिल्याचे उघडकीस आले होते. या हल्ल्यात, पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना लष्करच्या 10 भारी सशस्त्र अतिरेक्यांनी शहरात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 166 लोक ठार झाले, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. लष्करचा ऑपरेशन कमांडर लखवीला सुमारे सहा वर्षांच्या कोठडीनंतर एप्रिल 2015 मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातून सोडण्यात आले.