खून प्रकरणात तिघांना ‘जन्मठेप’ ! विधानसभा निवडणुकीच्या वादातून झाला होता खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात विधानसभा निवडणुकीच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे कार्यालयातील भरारी पथकाने या गुन्ह्यांचा तपास केला होता.

प्रमोद उर्फ किंग भाई स्वामी, जगदीश उर्फ पिंटू कोन्हेरीकर, प्रदीप उर्फ दीपक मठपती अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

पाच वर्षांपूर्वी (१३ ऑक्टोबर २०१४ ) विधानसभा निवडणुकीतील वादातून गुरुनाथ कटारे यांचा वळसंगजवळील मिलचे भागात तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन महिन्यांनी सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता. त्यानंतर आरोपी स्वामी, कोन्हेरीकर, मठपती यांना अटक करुन सीआयडीने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सीआयडीचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली माने यांनी या प्रकरणाचा तपासात मार्गदर्शन केले होते.