पुण्यात कार विक्रीच्या बहाण्यानं तरूणाला 3 लाखाचा गंडा

पुणे : पोलसनामा ऑनलाइन – महिंद्रा फायनान्स कंपनीत नोकरीस नसताना तेथील कार तरुणाला परस्पररित्या दाखवून त्याच्याकडून 3 लाखांची फसवणूक करणार्‍या आईसह मुलाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. जुलै ते ऑगस्ट 2019 कालावधीत घडली आहे.

प्रफुल्ल प्रभाकर उबाळे (वय 27) आणि कमल प्रभाकर उबाळे (वय 50, दोघेही रा. ससाणेनगर, हडपसर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांच्या एक साथीदार फरार आहे. याप्रकरणी कृष्णकुमार मेहता (वय 25, रा. वानवडी ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमारला कार खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने मित्राच्या ओळखीतील प्रफुल्ल आणि कमल यांच्याकडे मोटार खरेदी करण्याबाबत विचारणा केली. त्यामुळे उबाळेंनी जुलै ते ऑगस्ट 2019 कालावधीत कृष्णकुमारला महिंद्रा फायनान्स कंपनीच्या गोदामात नेउन मोटार दाखविली.

त्याठिकाणी मोटारीचा व्यवहार करुन ऑनलाईनरित्या 2 लाख 98 हजार रुपये उबाळेंनी स्वत:च्या बँकखात्यावर वर्ग करुन घेतले. त्यानंतर कृष्णकुमारने उबाळेंकडे मोटार मागितली तेव्हा त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी कृष्णकुमारला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णकुमारने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम.जी. त्र्यंबके अधिक तपास करीत आहेत.