अधिवेशन सुरू होण्यापुर्वीच 32 जणांचा अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार होती. पण अधिवेशन सुरु होण्याअगोदर विधान भवनाचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी प्रत्येकाला कोरोना टेस्ट करणे बंधनकारक होते. त्यामुळे या अधिवेशनासाठी साधारणपणे ३ हजार पेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये मंत्रालय विधिमंडळ कर्मचारी, पोलीस सुरक्षारक्षक, प्रसारमाध्यम आमदार यांचा समावेश आहे. आतापर्यंत जी माहिती हाती आली त्यानुसार, तीन हजार पैकी ३२ लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये विधिमंडळ मंत्रालय कर्मचारी, पोलीस सुरक्षारक्षक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

ज्या आमदारांनी विधान भवनामध्ये टेस्ट केल्या होत्या त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर ज्या आमदारांनी व मंत्र्यांनी खाजगी लॅब मधून टेस्ट केल्या आहेत त्यांचा रिपोर्ट अजून आला नाही आहे. अशी माहिती विधान भवनाकडून देण्यात आली आहे. ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांना तात्काळ स्वतंत्र विलगीकरणात जाण्यास सांगितले आहे तसेच जर लक्षण दिसून येत असतील तर रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना विधान भवनाकडून देण्यात आल्या आहेत.

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात प्रवेश करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत तरीसुद्धा देशात मात्र इंधनाच्या दराने उच्चांकी गाठली आहे. केंद्र सरकारकडून लावण्यात आलेल्या करांमुळे इंधनाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवनात प्रवेश करणार आहे.

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या काही चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तसेच देशात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकारकडून काँग्रेस सरकारांनी उभारलेले सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. तसेच पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावून जनतेची लूट केली जात आहे. LPG गॅस च्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. कोरोना संकटामुळे लाखो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

तसेच अनेक लोकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. तसेच अनेक छोटे- मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रेमात बेरोजगारी वाढली आहे. त्यामध्ये आता इंधन आणि पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. गेल्या ३ महिन्यांत गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे.या गोष्टींचा निषेध म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मंत्री व आमदार सायकलने प्रवास करून विधानभवनात येणार आहेत.