विरोध धुडकावत आणखी एका महिलेने घेतले शबरीमालात दर्शन

शबरीमला : वृत्तसंस्था – गेल्या आठवड्यात दोन महिलांनी केरळच्या शबरीमाला मंदिरात जाऊन भगवान आय्यप्पाचे दर्शन घेतल्याने केरळात सनातन्यांनी हिंसाचार माजवला होता. मात्र, या दहशतीला न जुमानता आणखी एका ३६ वर्षीय दलित महिला कार्यकर्तीने आयप्पा मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. मंगळवारी पहाटे आपण दर्शन घेतल्याचे या महिलेने म्हटले आहे.

पी. मंजू (३६) असे या जिगरबाज महिलेचे नाव आहे. तिने आपल्या फेसबुक पोस्टवरुन ही माहिती दिली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण ५० वर्षांच्या महिलेचा वेश परिधान करुन मंदिर प्रवेश केला होता. तिने मंदिरात दर्शन घेतानाचा आपला या अवतारातील फोटोही पोस्ट केला आहे. पोलिसांनीही तिच्या दाव्याला दुजोरा दिला असला तरी अद्याप याची पडताळणी सुरु आहे.
या महिलेने असाही दावा केला आहे की, आपण कोणतेही पोलीस संरक्षण घेतले नव्हते. अनेक भक्तांच्यासोबत आपणही या मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन घेतले. येथील १८ पवित्र पायऱ्याही आपण चढलो. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यांत ज्या २० महिला मंदिर प्रवेश करण्यात अपयशी ठरल्या होत्या. या महिलांमध्ये तिचाही समावेश होता, यासाठी कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी तिच्या दक्षिण केरळमधील कोल्लममधल्या घरावर हल्ला केला होता.

मी शबरीमला मंदिरात जाऊन भगवान अय्यप्पांचे व्यवस्थित दर्शन घेतले. सर्वसाधारण भाविक म्हणून मी मंदिरात प्रवेश केला होता. मात्र, त्यासाठी मी आंदोलकांपासून वाचण्यासाठी माझे केस पांढऱ्या रंगात रंगवले होते आणि वय झालेल्या महिलेसारखा वेश केला होता. यावेळी मला कोणीही ओळखू शकले नाही. भविष्यातही मी या मंदिरात प्रवेश करणार असल्याचेही तिने जाहीर केले आहे. महिला दलित फेडरेशनची ती सक्रीय कार्यकर्ती आहे. आपल्या एका मैत्रिणीनेही मंदिर प्रवेश केल्याचे तिने म्हटले आहे. मात्र, तिने आपले ठिकाण सांगण्यास नकार दिल्याचे मंजूने म्हटले आहे. यापूर्वी सुरुवातीला बिंदू अम्मिनी आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी पोलिसांच्या संरक्षणात मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर केरळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोठा हिंसाचार घडवून आणला होता.