खळबळजनक ! भायखळा कारागृहात इंद्राणी मुखर्जीसह 38 महिला कैद्यांना कोरोनाची बाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. दरम्यान भायखळा तुरुंगातही आता कोरोनाचा विस्फोट झाल्याचे समोर आले आहे. या तुरुंगात एकाच दिवसात 38 महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचाही समावेश आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरुंगातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दहा दिवसापूर्वी कोल्हापूर कारागृहात एकाच वेळी 28 कोरोना रुग्ण आढळले होते. दरम्यान मंगळवारी (दि. 20) राज्यात 62,097 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर तब्बल 519 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, मंगळवारी देशात 2020 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.