स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ३८ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वस्तात सोने विक्री करण्याच्या बहाण्याने दोघांना ३८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश दामोदर कामठे (२६, कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चेतन संजय घेले (२८, उंड्री) व  दिलावर खान (माणगाव ता. महाड जि. रायगड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा परिसरात राहण्यास आहेत. त्यांची आणि चेतन घेले व दिलावर खान यांची ओळख झाली. यातून घेले व खान याने त्यांना स्वस्तात सोने विकत देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून ६ ऑगस्ट २०१८ ते १७ सप्टेबर २०१८ या कालावधीत एकूण २८ लाख रुपये घेतले. तसेच असेच अमिष दाखवून इंद्रपाल सुरेश वाडेकर यांच्याकडूनही १० लाख रुपये घेतले. त्यानंतर कामठे यांनी त्यांच्याकडे सोन्याची मागणी केली. मात्र त्यांनी सोने दिले नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा तेही दिले नाहीत. त्यानंतर फसणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.