Coronavirus : नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या 38 जणांना ‘कोरोना’ची लागण, गुरुद्वारातील सेवकांची तपासणी

पंजाब : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील नांदेड येथे अडकलेल्या पंजाबच्या यात्रेकरू त्यांच्या घरी पोहचले आहेत. मात्र, पंजाबमध्ये पोहचल्यानंतर एक चिंता वाढली आहे. पंजाबमध्ये पोहचल्यानंतर या सर्व प्रवाशांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. यात काही यात्रेकरूंचे अहवाल येणं बाकी आहे. या यात्रेकरूंची सेवा करणाऱ्यांचीही देखील चाचणी करण्यात येणार आहे. तसेच या यात्रेकरूंना सोडवण्यास गेलेल्या सर्व चालकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

हल्ला महल्लासाठी पंजाबमधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने ते नांदेडमध्येच अडकून पडले. हे भावीक नांदेडमध्ये 40 दिवस मुक्कामी होते. त्यांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरु होते. महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्रान त्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सच्या 13 गाड्यांमधून 1700 जणांना घरी सोडण्यात आले. परवा सायंकाळी हे सर्व आपापल्या घरी पोहचले.

पंजाबमध्ये पोहचल्यावर स्थानिक प्रशासनाने त्यांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली होती. यापैकी गुरुवारपर्यंत 38 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील पंजाब सरकारच्या लक्झरी गाड्यामधून गेलेल्या तीन हजार यात्रेकरुंचीही तपासणीही केली जाणार आहे. दरम्यान, यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या ट्रॅव्हल्स बुधवारी रात्री नांदेड शहरात परतल्या. या गाड्यांना सीमेवरच रोखण्यात आलं. त्यानंतर 30 चालकांना एका आयुर्वेदिक महाविद्यालयात 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

या भाविकांच्या संपर्कात आलेल्या 250 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून सेवेकऱ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. सध्यातरी यांच्यामध्ये कोरोनाचे कोणतीही लक्षण आढळून आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.