home page top 1

चोरट्याकडून पावणे चार लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरफोडी करणा-या चोरट्याला अटक करुन सोन्याचे दागिने, सात मोबाईल फोन, तीन घड्याळे आणि एक मोटार सायकल असा एकूण 3 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पंकज हरिप्रसाद बाजुळगे (21, रा. ज्ञानदीप कॉलनी, रहाटणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रहाटणी, काळेवाडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोड्यांचे प्रकार मागील काही दिवसांपासून होत आहेत. या घरफोडी करणा-या चोराला पकडण्यासाठी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस काम करत होते. चोरी करणारा आरोपी काळेवाडी मधील धनगरबाबा मंदिराजवळ थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, लक्ष्मण आढारी, वासुदेव मुंढे, संतोष असवले, सुरेश जायभाय, सुनील गुट्टे, गोविंद चव्हाण, तुषार काळे, धनाजी शिंदे, अजिनाथ ओंबासे यांच्या पथकाने धनगरबाबा मंदिर परिसरात सापळा रचून पंकज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने काळेवाडी आणि रहाटणी भागातील सनशाईन व्हिला रो हाऊस सोसायटी, फाईव्ह गार्डन रो हाऊस सोसायटी व रॉयल पार्क सोसायटी या सोसायट्यांमध्ये चोरी केल्याचे त्याने सांगितले.

त्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी 73 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सात मोबाईल फोन, तीन नामांकित कंपन्यांची महागडी घड्याळे व एक दुचाकी असा एकूण 3 लाख 75 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा एक, घरफोडीचे तीन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील घरफोडीचा एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like