Good News : महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना, 44 टन ऑक्सिजन होणार पुरवठा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी गुजरातमधून महाराष्ट्राला 44 टन ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. हे ऑक्सिजन 3 टॅंकरमधून रेल्वेच्या रो-रो सेवेने सोमवारी (दि. 26) कळंबोली येथे दाखल होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. त्यामुळे ऑक्सिजनची आणखी काही गरज भागणार आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी आणखी ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. यात जामनगरमधून मुंबईसाठी आणि अंगुलमधून नागपूर, पुणेसाठी प्राणवायूची वाहतूक रेल्वेद्वारे केली जाणार आहे.

राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी विशाखापट्टणम येथून सात टँकर घेऊन ऑक्सिनज एक्स्प्रेस नुकतीच महाराष्ट्रात दाखल झाली. यातून नागपूर आणि नाशिक, नगर जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यात आली. यातून 100 पेक्षा अधिक टन ऑक्सिजनची वाहतूक केली होती. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेकडूनही पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस गुजरातमधील हापा येथून रविवारी सायंकाळी महाराष्ट्रासाठी सोडली आहे. 3 टँकरमधून 44 टन प्राणवायू घेऊन ही रेल्वे सोमवारी कळंबोलीत पोहोचेल. या ऑक्सिजन रेल्वेचा प्रवास विरामगम, अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि वसई रोड मार्गे होईल. जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीकडून हा ऑक्सिजनचा पुऱवठा केला आहे. भारतीय रेल्वेने रो रो सेवेमार्फत प्राणवायूची वाहतूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच छत्तीसगढहून दिल्लीसाठीही 4 टँकरमधून 70 मेट्रिक टन, बोकारो येथून लखनऊसाठी 5 टँकरमधूनही ऑक्सिजनची वाहतूक केली जाणार आहे.