‘या’ ५ सिनेमांवरून झाला प्रचंड ‘राडा’ ; परंतु, बॉक्स ऑफिसवर ‘छप्परफाड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिनेमा आणि वाद यांचं खोल नातं आहे. प्रत्येक वर्षी अनेक नवीन सिनेमे तयार होतात. नेहमीच एखादा तरी सिनेमात वादात सापडतोच. कधी एखाद्या सिनेमाच्या गोष्टीवरून सवाल उपस्थित होतात तर कधी स्टार्सच्या वक्तव्यांवरून सवाल उपस्थित होताना दिसतात. आयुष्मान खुरानाचा सिनेमा ‘आर्टीकल 15’ 28 जून रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची स्क्रिनिंगही मुंबईत ठेवण्यात आली आहे. हा सिनेमाही वादाच्या भोवऱ्यात सुटलेला नाही. ब्राह्मण समाजाने या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. असे अनेक सिनेमे आहेत ज्यांच्या रिलीज होण्यावरून बराच गोंधळ झाला परंतु नंतर त्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

१) कबीर सिंह- शाहिद कपूरच्या कबीर सिंह सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 20.21 कोटी कमावले. सिनेमा रिलीज होऊन 6 दिवस झाले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने 120.81 कोटींची कमाई केली आहे. कबीर सिंह सिनेमाही वादात सापडला. अनेकांनी हा सिनेमा महिला विरोधी असल्याचं म्हटलं आहे. मुंबईतील डॉक्टरांनी कबीर सिंहच्या मेकर्सविरोधात केस दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, या सिनेमात मेडिकल प्रोफेशनला चुकीचं दाखवण्यात आलं आहे.

२) भारत – सलमान खानचा सिनेमा भारत रिलीज होण्याच्या 4 दिवस आधीच अडचणीत सापडला होता. भारत सिनेमाविरोधात दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमातील सलमान खानच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. या याचिकेत म्हटलं आहे की, सिनेमाचे नाव भारतीय संविधानाच्या कलम 3चं उल्लंघन करत आहे. या कलमानुसार, कोणत्याही देशाचं प्रतिक चिन्ह किंवा नावाचा वापर कमर्शिअल हेतूसाठी केला जाऊ शकत नाही. सलमान खानच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग मिळाली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 42.30 कोटी कमावले आहेत. या सिनेमाने 200 कोटीचा आकडा पार केला आहे.

3) पद्मावत – संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचंही वादाशी जवळचं नातं आहे. या सिनेमाच्या नावावरून खूपच गोंधळ झाला होता. सीबीएफसीच्या आदेशानंतर याचं नाव बदलण्यात आलं. या सिनेमाला जाळपोळ आणि धमक्यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. दीपिकाचे नाक कापण्याचीही धमकी देण्यात आली होती. अनेक राज्यात बॅन झालेल्या या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 18 कोटी कमावले होते. एकूण या सिनेमाने 585 कोटी कमावले होते.

४) गोलियों की रासलीला : रामलीला – बाजीराव मस्तानी या सिनेमाआधी भन्साळींनी दीपिका पादुकोण रणवीर सिंहसोबत रामलीला सिनेमा बनवला होता. हा सिनेमा आल्यानंतर त्याच्या नावावरून वाद झाला. त्यामुळे भन्साळी यांना सिनेमाचे नाव बदलून गोलियों की रासलीला : रामलीला ठेवावं लागलं. या सिनेमाने पहिल्या दिवशी 12.80 कोटी कमावले होते. या सिनेमाने एकूण 356 कोटींची कमाई केली होती.

५) पीके – आमिर खानचा सिनेमा पीके 2014 साली रिलीज झाला होता. या सिनेमावरूनही खूप गोंधळ झाला होता. या सिनेमावरून हिंदू संघटनांनी आरोप लावले होते की, या सिनेमात हिंदू धर्माच्या देवी-देवतांचा अपमान करण्यात आला आहे. हा सिनेमा बॅन करण्याचीही मागणी करण्यात आली होती. वादात सापडल्यानंतरही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एन्ट्री केली. या सिनेमाने पहिल्या दिवशीच 26.63 कोटींचं कलेक्शन केलं होतं.