गॅस गळती होऊन कासारवाडीत ५ जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड येथील कासारवाडीमधील एका घरात गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत घरातील पाच जण जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

शोभा बिरादार (वय ३०), गणेश बिरादार (वय ८), शुभम बिरादार (वय ५), देवांश बिरादार (वय ३), विजय जाधव (वय २२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्वांना अधिक उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कासारवाडी येथील केशवनगरमध्ये गुरुनानक कॉलनीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. येथे बिरादार कुटुंब दुसऱ्या मजल्यावर राहतात. सकाळी घरातील सर्व जण झोपले असताना अचानक आग लागली. त्यामुळे कोणालाही सर्वप्रथम समजले नाही. आग भडकल्यानंतर त्यांना जाग आली. पण आग इतकी भडकली होती की, त्यातून त्यांना बाहेर पडता आले नाही. शेजारील नागरिकांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली व सर्वांना घराबाहेर काढले. अग्निशामक दलाला साडेआठ वाजता या घटनेची माहिती मिळाली. अग्निशामक दलाची गाडी जाईपर्यंत लोकांनी आग विझविली होती. त्यानंतर अग्निशामक दलाने ती जागा थंड केली.
गॅस गळती होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. वन रुम किचन मधील या घरातील किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.