Coronavirus Lockdown : 5-स्टार हॉटेल बनलं ‘कोरोना’च्या रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचं घर, दिल्ली आणि UP सरकारचा ‘निर्णय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. दिल्ली सरकारचे लोकनायक रुग्णालय आणि जीबी पंत रुग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचे घर हॉटेल ललित असणार आहे. डॉक्टरांच्या निवासासाठी या हॉटेलच्या 100 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांचा येथे राहण्याचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार देणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने डॉक्टरांना लखनऊमध्ये हयात रेजेंसी, लेमन ट्री सारख्या 4 लक्झरी हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. या 4 मधल्या दोन हॉटेल्समध्ये राम मनोहर लोहिया वैद्यकीय विज्ञान संस्थेचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी राहणार आहे.

इतर दोन हॉटेल्समध्ये संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एसजीपीजीआय)चे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी राहणार आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना त्यांच्या घराचे मालक आणि कॉलनीतील लोक घरात जाण्याची परवानगी देत नाही म्हणून सरकारने हा निर्णय घेतला. या प्रकारच्या बातम्या देशातील बर्‍याच ठिकाणांहून समोर आल्या होत्या जिथे भाड्याने राहणाऱ्या डॉक्टरांना लोक घरात प्रवेश देत नव्हते. आतापर्यंत देशात सुमारे 1,100 कोरोना विषाणू संक्रमित रूग्ण आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे.