50 कोटीचं खंडणी प्रकरण ! राष्ट्रवादी काँग्रेसनं हकालपट्टी केलेल्या मंगलदास बांदलला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध सराफाला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत होती. या अटकेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील 42 वर्षीय एका प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाला 50 कोटी रुपयांची खंडणी मागणी करण्यात आल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणात पोलिसांनी प्रथम आशिष हरिश्चंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केटयार्ड) या तिघांना अटक केली होती. या तिघांकडून सराफी यांचा वाहन चालक संदेश वाडेकर याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.

त्याचवेळी याप्रकरणात बांदल यांचा समावेश असल्याचे समोर आले होते. तसेच यातील फिर्यादी यांनी तक्रारीत बांदल यांचे नाव देखील दिले होते. त्यानुसार पोलीस चौकशी करत होते. चौकशीत दोघांची सराफी यांची टिळक रस्त्यावरील एका कॅफेमध्ये भेट झाली होती. यावेळी चौधरी देखील सोबत होता. त्यावेळी चौधरी माझी सर्व कामे पाहिल असे बांदल याने सराफींना सांगितले होते. त्यानंतर चौधरी याने त्यांच्याकडे व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 कोटींची मागणी केली होती.

त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून चौकशी करण्यात येत होती. त्यांना चौकशी केल्यानंतर परत बोलविण्यात येत होते. दरम्यान, फेब्रुवारीपासून बांदल हे यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात होते. हे प्रकरण सुरू झाल्यानंतर त्यांचे फोन्स आणि भेटी झाल्या आहेत. त्यातून काही चौकशीत बाबी समोर आल्या आहेत. त्यामुले बांदल यांचा या प्रकरणातील सहभाग सिद्ध झाला आहे. त्यानुसार त्यांना अटक केली आहे. उद्या बांदल यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.