पदवीधारकांसाठी 5000 तर पदव्युत्तरांसाठी 7500 रूपये बेरोजगारी भत्ता, काँग्रेसनं केली घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. सत्ताधारी पक्षासोबतच इतर पक्षांनीही चांगलीच कंबर कसली आहे. काँग्रेस नरमाईची भूमिका दाखवत असले तरी भाजप मात्र जोशात सत्ता काबीज करण्यासाठी मैदानात उतरले आहे. दरम्यान, काँग्रेसला दिल्लीतही महाराष्ट्रासारखे निकाल लागण्याची आशा आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यात महिन्याला 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार असल्याचे नमूद केलं आहे. याबरोबर स्वस्तात जेवण उपलब्ध करण्यासाठी 100 इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय लाडली योजना पुन्हा सुरू करणार असून विद्यार्थ्यांना नर्सरी ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी 1 रुपयांत मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला सुरक्षा, शिक्षण, वीज आणि पाण्याचा पुरवठा, रोजगार आणि दलित आदिवासींच्या कल्याणासाठी असे ऐकून 20 मुद्दे या जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहेत.

या जाहीरनाम्यातील महत्वाची घोषणा म्हणजे बेरोजगारांना भत्ता देण्यात येणार आहे. पदवीधारकांसाठी 5 हजार रुपये तर पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.