नोकरीच्या अमिषाने तरुणीला ५० हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- भारतीय विमान पतन प्राधिकरणामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीला ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह पुरुषावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेघा महेश सुतकर (२३, लमाण तांडा येरवडा) या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार राहूल जैन व संजना अशा दोघांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही उच्चशिक्षित आहे. सध्या ती पुण्यात नोकरी शोघत आहे. नोकरी शोधत असताना तिला राहूल जैन व संजना यांनी फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर तिला रिझ्यूम मेल करण्यास सांगितला. भारतीय विमान पतन प्राधिकरणमध्ये जॉब व्हॅकन्सीसाठी पात्रता व फीस यांची माहिती मेल करून तिला सांगण्यात आली. त्यानंतर तिला या पदासाठी पात्र असल्याचे सांगून फॉर्म फी, सिक्युरिटी डिपॉझीट अशा वेगवेगळ्या बहाण्याने खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर तिने ५० हजार ५०० रुपये भरले. काही काळाने त्यांनी फोनच बंद केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग साबळे करत आहेत.