Coronavirus : चिंताजनक ! पुण्यात दिसवभरात 5 जणांचा बळी तर 56 नवे ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत जिल्ह्यात 43 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन – पुणे शहरातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पुणे शहरात आज तब्बल नवीन ५३ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात ६३ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्यु झाला असून पुणे जिल्ह्यात मृत्यु पावलेल्यांची संख्या ४३ झाली आहे.


पुणे शहरात दररोज विक्रमी संख्येने कोरोना बाधित आढळून येऊ लागले आहेत. आज दिवसभरात शहरात तब्बल ५३ जण नवीन बाधित आढळले आहेत. पुण्यात एकूण ३६९ रुग्ण झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आज ६ नवीन रुग्ण आढळले असून पिंपरीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ वर गेली आहे. नगरपालिका क्षेत्रात एका रुग्णांची वाढ होऊन तेथे १५ रुग्ण झाले आहेत. तर पुणे ग्रामीणमध्ये आज ३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे येथील संख्या ११ झाली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४३७ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.

आतापर्यंत पूर्णपणे बरे झालेल्या ४२ जणांना घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या विविध रुग्णालयात ३५४ रुग्णांवर उपचार करण्यात येत असून त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत ४ हजार ७४८ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ हजार ९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४ हजार १३९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात अद्याप ५६९ जणांना ठेवण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येऊ लागले आहे. भोर आणि वेल्हा या दुगर्म भागातही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिक्रापूर येथील एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या परिसरातील चिंता वाढली आहे. . पिंपरी चिंचवडमध्ये यापूर्वी कोरोना रुग्ण शहरात आढळून येत होते़\. आता उपनगरांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.