अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 6 ‘कोरोना’चे रुग्ण आढळले, जिल्ह्याची संख्या 60 वर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी नगर शहरातील सारसनगर येथील 53 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा आणखी 5 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिवसभरात शहरात एकूण 6 रुग्णांची भर पडली असून जिह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 झाली आहे.

सायंकाळी कोरोना बाधित आढळलेल्या 5 व्यक्तींपैकी 3 व्यक्ती मंगळवारी कोरोना बाधित आढळलेल्या सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत. तर एक व्यक्ती या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, तेथील रिसेप्सनिस्ट आहे. आणखी एक व्यक्ती निघोज येथील असून या व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. आज एकूण 11 अहवाल प्रप्त झाले होते.

सारसनगर येथील बाधित व्यक्ती चालक असून त्याने पुणे-मुंबई असा प्रवास केल्याची माहिती आहे. या व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी सुभेदार गल्लीतील बाधित आढळलेल्या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच या महिलेने ज्या डॉक्टरकडे उपचार घेतले होते तेथील रिसेप्शनीस्टही बाधित आढळून आली.