कारच्या धडकेत ६ वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू

सांगवी : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक बसून एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पिंपळे गुरव येथील ज्ञानेशपार्क येथे घडली.
लावण्या सचिन कडलक असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. सचिन सुभाष कडलक यांनी सांगवी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी दिलीप खंडू शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लावण्या दत्तात्रय देशमुख यांच्या घरापुढे खेळत होती. यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या महिंद्रा एक्स यु व्ही या पांढ-या रंगाच्या गाडीने लावण्याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन लावण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लावण्याच्या आत्याचे लग्न असल्यामुळे ती कुटुंबासमवेत ज्ञानेश पार्क येथे आली होती. घरामध्ये आनंदाचे वातावरण असताना लावण्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबासह परिसरात  शोककळा पसरली आहे. पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.