काय सांगता ! होय, 62 वर्षांच्या आजी 230 किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी विधेयकाविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दशर्वण्यासाठी एका 62 वर्षाच्या आजीने थेट पटियाला ते सिंघू बॉर्डर असे 231 किमी अंतर गाडी चालवत आंदोलनस्थळी पोहचल्या आहेत. एकीकडे हे आंदोलन लांबत चालले असतानाच दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा आणि विरोध करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. असे असनाताच या आजींनी मात्र आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या आजीचा फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मनजीत कौर (वय 62) असे या आजीचे नाव आहे. पटियाला ते सिंघू बॉर्डर हे अंतर 231 किलोमीटर इतके आहे. किसान एकता मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ओपन जीप चालवणाऱ्या या महिलेचा फोटो पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. 62 वर्षीय मनजीत कौर या पटियालावरुन सिंघू बॉर्डरवर गाडी चालवत आल्या आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्या या ठिकाणी आल्या आहेत, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.

या फोटोमध्ये मनजीत या गाडी चालवताना दिसत असून त्यांच्या बाजूला त्यांच्या सहकारी बसल्या आहेत. तर मागील बाजूस उभ्या असणाऱ्या महिला कार्यकर्त्या घोषणा देताना दिसत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. केंद्राच्या निमंत्रणावर आज निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.