काय सांगता ! होय, अमेरिकेत फक्त 7 महिन्याचा मुलगा बनला ‘महापौर’

लॉस एन्जलिस : वृत्तसंस्था – अमेरिकेत २०१९च्या शेवटी एक अद्भूत इतिहास रचला गेला आहे. येथे एका ७ महिन्याच्या बाळाला चक्क मेयरपदी बसविण्यात आले. या बाळाची नोंद सर्वात कमी वयाचे मेयर म्हणून झाली आहे. त्यास टेक्सासमधील व्हाईट हॉलमध्ये मानद मेयरपदाची शपथ देण्यात आली. सात महिन्यांचा हा मुलगा विल्यम चार्ली मॅकमिल्यन, जो चार्ली नावाने ओळखला जातो. त्याच्या शपथविधीसाठी एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

टेक्सासच्या नवसोटा शहराचे लोकप्रतिनिधी जोस फुल्टज यांनी सांगितले की, आम्ही आमच्या देशाच्या इतिहासात एका कठिण कालखंडात आहोत, आणि मेयर चार्ली समाजात शांती आणि दया निर्माण करण्यासाठी मदत करत आहेत. ते प्रत्यक्षात हे लक्ष्य पूर्ण करणार आहेत. मेयर चार्लीला ऑक्टोबर महिन्यात ग्रिम्स काउंटीमध्ये स्थानिकांच्या सेवेसाठी निवडण्यात आले होते.

फुल्टज यांनी सांगितले की, चार्ली त्याचे आई-वडील चाड आणि नॅन्सी यांचा दत्तक पुत्र आहे. सायंकाळी साडेचार वाजता चार्ली शपथग्रहण सोहळ्याच्या ठिकाणी पोहचला आणि आपल्या पालकांचा हाथ पकडून उभे राहून त्याने शपथ घेतली. यावेळी उपस्थित स्थानिक या अद्भूत क्षणाचे साक्षीदार झाले.

संपूर्ण सोहळ्यात चार्ली तेथे बसून होता आणि आपल्या गा-गे-गू भाषेत तो लोकांशी बोलत होता. यावेळी बँडवर देशभक्तीपर संगीत वाजविण्यात येत होते. यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली. संपूर्ण कार्यक्रम अतिशय योजनाबद्ध आयोजित करण्यात आला होता. हा एक आगळा वेगळा शपथग्रहण सोहळा होता, ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती, असे फुल्टज यांनी सांगितले.