कंगनाच्या ‘त्या’ दाव्यावर शेतकरी आजीचं जोरदार ‘प्रत्युत्तर’ ! म्हणाली – ‘100 रुपयांचं काय करू ? मी 13 एकर जमिनीची मालकीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं अलीकडेच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. कंगना म्हणाली होती की, शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेत आहे. याआधीही कंगनानं शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणाऱ्या 90 वर्षीय बिलकीस दादी सोबत केली होती. यानंतर ती ट्रोल झाली आणि तिनं ते ट्विट डिलीट केलं होतं. कंगनानं असा दावा केला होता की, हे 100 रुपयांसाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असतात.

फोटोतील दोन्ही वृद्ध महिला बिलकीस दादी असल्याचं कंगनानं सांगितलं होतं. परंतु त्यातील एक बिलकीस बानो आणि एक भटींडाच्या बहादूरगड जांदियां गावात राहणाऱ्या मोहिंदर कौर होत्या. अशात आता मोहिंदर कौर यांनी कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना मोहिंदर कौर म्हणाल्या, मला कोणीतरी सांगितलं की, एका अ‍ॅक्ट्रेसनं माझ्याबद्दल असं काही बोललं आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. ती कधी माझ्या घरी नाही आली. तिला नाही माहीत मी काय करते. मी 100 रुपयांचं काय करू. मी 13 एकर जमिनीची मालकीन आहे.

याशिवाय त्या असंही म्हणाल्या, शेती खूप सामान्य काम आहे. म्हणून मी निर्णय घेतला की, मी विरोध प्रदर्शनात सामील व्हावं. आताही एवढी ताकद आहे की, दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी होईन.