लाचेची मागणी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी आरोपीच्या भावाकडे ५० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चार दिवस सापळा रचला मात्र त्यांच्यावर सापळा कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाच्या मोबाईलवर रेकॉर्ड झालेल्या संभाषणाच्या आधारे आज (बुधवार) नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बाजीराव लहाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल केशव केरबा हाके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्यरत आहेत. याप्रकरणी २७ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली आहे.

तक्रारदार याच्या भावावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला पिसीआर मिळाला आहे. पिसीआर दरम्यान भावाला चांगली वागणूक देण्यासाठी लहाणे याने १६ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराकडे ५० हजार रुपायांची लाच मागितली. तडजोडीमध्ये २५ हजार देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी करुन सलग चार दिवस सापळा रचला. मात्र, दरम्यानच्या काळात आरोपींनी तक्रारदाराकडे कोणताही संपर्क केला नाही. अखेर लाच लुचपत विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी मागील फोन वरील संभाषणानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यात झालेल्या संभाषणावरुन त्यांनी पैशाची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाल्याने आज (बुधवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक यांच्यावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कॉन्स्टेबल विरुद्ध सहायक पोलीस निरीक्षकांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड विभागाचे लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी बी.एच. काकडे व त्यांचे सहकारी यांनी केली.