शाळेत नापास विद्यार्थी हा कायम टॉपर विद्यार्थ्याला शिव्या घालतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी राफेलचा करार हा महत्त्वाचा आहे. या करारामुळे सरकारचा पैसाही मोठ्या प्रमाणावर वाचला आहे. असं असतानाही दररोज खोटे आरोप करण्यात येत आहेत. शाळेत नापास विद्यार्थी हा कायम टॉपर विद्यार्थ्याला शिव्या घालत असतो. तसाच हा प्रकार असल्याचा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांना लगावला.

अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन परतल्यानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. परदेशात उपचार घेत असताना देखील जेटली यांनी ब्लॉगच्या माध्यमातून विरोधाकांचा संमाचार घेतला आहे. त्यामुळे जेटली यांचे नाव माध्यमात कायम चर्चेत राहिले आहे. जेटली यांनी आपल्या नव्या ब्लॉगमध्ये राहूल गांधींना नापास विद्यार्थ्याची उपमा दिली आहे.

राफेल, घटनात्मक संस्थांची स्वायतत्ता आणि जीएसटी अशा अनेक मुद्यांवर जेटलींनी आपलं मत व्यक्त केलं. ते आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले, “गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसने अनेक खोट्या गोष्टींचा प्रचार केला, मोहिमा राबविल्या. मात्र सत्य हे अखेर सत्यच राहतं. कितीही खोटा प्रचार केला तरी सत्य लपून राहात नाही”. अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. या आधीही जीएसटी, नोटबंदी, घटनात्मक संस्था, असहिष्णुता अशा अनेक मुद्यांवर काँग्रेसने खोटा प्रचार केला असा आरोपही जेटली यांनी आपल्या ब्लॉगमधून केला आहे.