धर्मांतर करून परदेशात पलायन करणाऱ्याला एटीएसकडून अटक

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर येथील उदगीर शहरात बेकरीत काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. विशेष म्हणजे हा तरुण मुळ हिंदू असून त्याने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. त्याने बनावट कागदपत्रे गोळा करून पासपोर्टही तयार करून घेतला आहे. नरसिंग जयराम भूयकर उर्फ मोहम्मद रेहमान इबनेआदम असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुळचा बीदर जिल्ह्यातील जहीरबाद येथील नरसिंग जयराम भूयकर हा ३० वर्षीय तरुण कामधंद्याच्या निमित्ताने काही वर्षापूर्वी उदगीर (जि.लातूर) येथे आला होता. उदरनिर्वाहासाठी तो उदगीर येथील एका बेकरीत काम करीत होता. त्याने हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्विकारला. त्याने पासपोर्टसाठी धर्मांतर केलेल्या नव्या कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यास सुरुवात केली. धर्मांतर करूनही पासपोर्टसाठी आवश्यक असलेले आई-वडिलांचे नाव बदलता येत नाही. परंतु, या आरोपीने आई-वडिलांच्या खोट्या नावाची कागदपत्रात नोंद केली. त्यासाठी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून घेतले. या सर्व कागदपत्रांच्या आधारे त्याने बँकेत खातेही काढले.
आई-वडिलांचे नाव खोटे, कागदपत्रेही बनावट 
 आरोपीने एका एजंटमार्फत पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज केला. यामध्ये त्याने वडिलांचे नाव इबनेआदम तर आईचे नाव मोहम्मद अवलियाबी अशी खोटी माहिती भरली होती. पोलीस पडताळणीत अर्जात नमूद करण्यात आलेला पत्ता खोटा आढळून आला. त्याचा अर्ज रद्द करण्याचा अहवाल उदगीर पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयास दिला होता. हे समजताच तरुणाने पुन्हा लातूर येथील एका एजंटाला हाताशी धरून पीपी फॉर्म भरून नवा पत्ता दिला. त्याप्रमाणे पासपोर्टही तयार करून घेतला. या सर्व प्रकरणाची महिती गुप्त माहितीगाराने दहशतवाद विरोधी पथकास दिल्याने त्या तरुणाचा प्लॅन फसला आहे.
दहशतवादीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक डाबेराव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने उदगीरमध्ये धाड टाकून आरोपीला अटक केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये होत असलेल्या मुस्लीम धर्माच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी एवढा अट्टाहास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.