केजरीवाल सरकारची मोठी घोषणा ! दिल्लीतील आंदोलक शेतकर्‍यांना एकदम ‘फ्री’मध्ये देणार Wi-Fi ची सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक महिन्याहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलकांसाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने एक महत्वाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाने शेतकऱ्यांना मोफत वाय-फाय देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा यांनी ही माहिती दिली आहे.

वार्ताहरांना बोलताना राघव चड्डा म्हणाले, “खराब नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना इंटरनेट वापरण्यात त्याचसोबत कुटूंबीयांसोबत व्हिडीओ कॉलिंग वर बोलताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी होत्या. म्हणून शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी फ्री वाय-फाय हॉट स्फोट्स लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांकडून मागणी होईल तिथे हॉट स्फोट लावले जातील,” असे चड्डा यांनी सांगितले.

शेतकरी संघटना आक्रमक

कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र आणि शेतकरी संघटना यांच्यात आज, बुधवारी चर्चा होणार आहे. दबावतंत्र परिणशून्य ठरेल, असे स्पष्ट करत केंद्राने कठोर भूमिका घेतली असताना शेतकरी नेत्यांनीही कार्यसुचीतील चार मुद्द्यांवर चर्चा करावी, या मागणीचा पुनरुच्चार करत मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली.

तीन कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करावी, किमान आधारभूत किमतीची हमी द्यावी, विजदुरुस्ती विधेयकात बदल करावेत आणि खुंट जाळल्याबद्दल होणाऱ्या कारवाईतून शेतकऱ्यांना वगळावे, असे चार मुद्दे शेतकऱ्यांनी केंद्रापुढे ठेवले आहे. या चार मुद्द्यांवर तर्कशुद्ध तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, असे पत्र ४० संघटनांच्या वतीने मंगळवारी केंद्राला पाठवण्यात आले.