अबब ! देशात दररोज सापडतात तब्बल 2200 बनावट नोटा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराला व बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर केली होती. त्याद्वारे एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. भाजपने नोटबंदीचे कितीही समर्थन केले तरी आता ही नोटबंदी कशी अपयशी ठरली आहे, हेच त्यांचे मंत्री संसदेत सांगत आहेत. नोटबंदी केल्यानंतरही बनावट नोटांचे प्रमाण कमी झाले नाही. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३ वर्षात दररोज सरासरी २२०० हून अधिक बनावट नोटा सापडत आहेत. त्यात सर्वाधिक ८ लाख नोटा या लॉकडाऊनच्या काळात सापडल्या आहेत.

राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नावर लेखी उत्तरात सांगितले की, गेल्या ३ वर्षात २४ लाखांहून अधिक बनावट नोटा आढळून आल्या आहेत.

२०१७ – १८ मध्ये ५२२७८३, २०१८ -१९ मध्ये ३१७३८४ आणि २०१९ -२० मध्ये २६६६९५ अशा एकूण ११ लाख ६ हजार ८६२ बनावट नोटा आढळून आल्या. याशिवाय गृह खात्याने केलेल्या विविध कारवायांमध्ये १३ लाख १६ हजार ७४५ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

हे पाहता नोटबंदी करताना केलेले सर्व दावे विफल ठरले असून बनावट नोटांना पायबंद घालण्यात अजून तरी सरकारला यश आले नसल्याचे दिसून येते.