25000 रुपयाची लाच घेताना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण कार्यालयातील 2 क्षेत्रीय अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – खडी क्रशर मशीन चालविण्याची परवानगी देण्यासाठी 25 हजाराची लाच घेताना नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयातील दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (गुरुवार) सातपुर येथील उप प्रादेशिक अधिकारी कार्यालयात करण्यात आली. प्रकाश निवृत्ती धुमाळ आणि दिनेशभाई भिका वसावा अशी रंगेहाथ पकडण्यात आल्या दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्रकाश धुमाळ याच्याकडे उप प्रादेशिक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

तक्रारदार यांनी घोटी येथील खडी क्रशर मशीन चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी सातपुर येथील प्रदूषण नियंत्रक मंडळ कार्यालयात एक महिन्यापूर्वी अर्ज केला होता. या अर्जावर कार्यवाही करून परवानगी देण्यासाठी प्रकाश धुमाळ याने स्वत:साठी 10 हजार आणि दिनेशभाई वसावा याने 15 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पंचासमक्ष पडताळणी केली असता धुमाळ आणि वसावा यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सातपुर येथील औद्योगिक भवनातील उप प्रादेशिक कार्यालयात सापळा रचण्यात आला. धुमाळ याला 10 हजार रुपयाची लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.