9000 हजार रुपयांची लाच स्विकारताना बांधकाम विभागातील अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धामणगाव रेल्वे (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाइन – सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी दोन शासकीय अभियंत्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) कारवाई करून पंचायत समिती बांधकाम विभागाचा शाखा अभियंता गजेंद्र जयसिंग परमाल याला लाच घेताना अटक केली. ही कारवाई उपअभियंत्याच्या नेहरूनगर येथील राहत्या घरामध्ये करण्यात आली. तर चांदूर रेल्वे येथील उपअभियंता किशोर हरिभाऊ साकुरे याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रादाराने केलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी शाखा अभियंता गजेंद्र परमाल याने 7 ऑगस्ट रोजी दोन टक्के दराने 4 हजार रुपये लाचेची मागणी केली आणि 8 आणि 14 ऑगस्ट रोजी लाचेची रक्कम स्विकारली. याच एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी उपअभियंता किशोर साकुरे याची स्वाक्षरी घेण्यासाठी तक्रारदार त्याच्याकडे गेले होते. त्या देखील दोन टक्के दराने 4 हजार रुपये व पूर्वीच्या पेव्हरच्या कामातील 5 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. या दोघांविरोधात दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस हवालदार माधुरी साबळे, पोलीस नाईक सुनील व हाडे, पोलीस शिपाई अभय वाघ, महेंद्र साखरे, चालक पोलीस शिपाई चंद्रकांत जनबंधू यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –