सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रूग्णवाहिकेला मोठा अपघात, तिघांचा जागेवर मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका पाठीमागून ट्रकवर आदळल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ही धडक इतकी भीषण होती की, रुग्णवाहिकेतील तीन ठार, तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

रवी माणिक राठोड (वय ३८) व बुद्धीई चन्नापागूल (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत, तर मृतांमध्ये ३५ वर्षांच्या शववाहिका चालकाचाही समावेश असून, त्याचे नाव समजू शकले नाही. पुण्यात वारजे माळेवाडीत रोजगारासाठी स्थायिक झालेल्या राठोड कुटुंबीयांतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यविधी मूळगावी उरकण्यासाठी मृतदेह शववाहिकेतून हैदराबादकडे नेण्यात येत होते. शववाहिकेत, मृतदेहाजवळ शोकाकुल राठोड कुटुंबीयांसह निकटचे काहीजण बसले होते. मध्यरात्री शववाहिका मृतदेह घेऊन पुण्याहून निघाली होती. पहाटे मोहोळजवळ आल्यानंतर समोरील एका वाहनाला शववाहिका अचानकपणे आदळली. शववाहिकाचालकाला पहाटे डुलकी लागल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे मोहोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. सर्व दहा जखमींना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.