खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना अटक 

लोणी काळभोर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना एलसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई पथकाने चिंचवड येथे केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याव गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते. अखेर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद केल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.
निखिल उर्फ सोन्या नंदू घायाळ (वय २६ रा.दांडेकर पूल, पुणे मूळ रा. लोणी स्टेशन ता.हवेली जि.पुणे) फैजान उर्फ बबलू शकील अन्सारी (वय २० रा.लोणी स्टेशन ता.हवेली जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
थेऊर येथील पैलवान दत्तात्रय उर्फ आबा पांडूरंग काळे यांचे गाडीवर ८ सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमरास पुणे-सोलापूर रोडवर हल्ला करण्यात आला होता. काळे हे त्यांच्या सफारी गाडीतून (एमएच १२ केजे ९२९२) थेऊर येथील घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी आडवून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. तसेच काळे आणि चालकाला शिवीगाळ करुन दमदाटी करत गाडीची काच फोडली. आबा काळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपींवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते मात्र ते पोलिसांना सापडत नव्हते.
दरम्यान हा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक संदीप जाधव यांनी गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील राजेंद्र पुणेकर, महेश गायकवाड, निलेश कदम, रवि शिनगारे, सचिन गायकवाड यांनी आरोपींचा शोध घेत होते. शोध घेत असाताना आरोपी चिंचवड येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी चिंचवड येथे सापळा रचून आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी सोन्या घायाळ याचेवर आप्पा लोंढे टोळीतील गुन्हेगार अल्ताफ शेख याचे खूनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच खूनाचा प्रयत्न, मारहाण असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. त्याचा साथीदार बबलू अन्सारी याचेवर बेकायदेशीर पिस्टल बाळगलेबाबत आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
आरोपींना पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज (गुरुवार) रोजी त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी कोर्टात हजर करण्यात आले. असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांती कुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करीत आहेत.
जाहिरात