गुन्हे दाखल करण्यास विलंब, ११ अधिकारी आणि ३३ कर्मचाऱ्यांवर कारवाई

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यावर ठाणे अंमलदार आणि अधिकाऱ्यांची विनवणी करावी लागते. यानंतर फिर्याद कोणाविरुद्ध आहे हे पाहून विलंबाने फिर्याद घेतली जाते. परंतु अशा विलंबाने फिर्याद घेणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल ११ अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेल्यामध्ये तब्बल ५०० गुन्हे उशिराने दाखल केलेल्या ९ पोलीस अधिकारी व ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना तर मागील भांडणाचा राग अशा प्रकरणातील १०३ गुन्ह्यांत २ अधिकारी व २ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावणे, वेतनवाढ रोखणे, बदली करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

ज्या पोलीस ठाण्याकडे उशिराने गुन्हे दाखल झाले आहेत असे गुन्हे उशिराने का दाखल झाले ? या बाबत संबंधित तक्रारदार व पोलीस ठाण्याकडे चौकशी करुन पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे उशिराने गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधीत दोषी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाते.

उशिराने दाखल झालेल्या ५०० गुन्ह्यांबाबत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार कामात कसूर केल्याप्रकरणी ९ पोलिस अधिकारी व ३१ कर्मचार्‍यांना शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून आला. सप्टेंबर २०१८ मध्ये उशिराने दाखल होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण हे १५४ होते. ते कमी होऊन फेब्रुवारी २०१९ अखेर २७ वर आले आहे.